मराठी कॉर्नर सभासद

Friday, November 20, 2009

स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय ? हे सर्वात पहिले आपण जाणुन घेतले पाहीजे. स्त्री मुक्ती म्हणजे निव्वळ पुरुषांच्या विरोधात जाणे नव्हे तर `पुरुषप्रधान' संस्कृतीचा पगडा असलेल्या विशिष्ट पद्धतीचा विरोध करणारी चळवळ. पूर्वीची जाचक बंधने आज स्त्रियांवर नाहीत. पण याचा अर्थ स्त्री सर्वार्थाने मुक्त झाली असा होत नाही. स्त्री-मुक्ती चळवळी ठिकठिकाणी कार्यरत आहेत. हे विचार, ह्या चळवळी शहरापुरत्याच मर्यादित आहेत. दलित, आदिवासी, शोषित, पीडीत स्त्रियांना त्याही खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांना या चळवळीची सुतराम कल्पना नाही.

आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने शिरकाव केलेला आहे. पुरुषांनी स्त्रियांना मुक्त केले, मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिले. त्यातून त्यांची मानसिकता किमान बदलली आहे. स्त्रियांना मुक्ती हवी म्हणजे काय हवे? कोणापासून मुक्ती हवी? स्त्रियांच्या कार्यक्षेत्राबाबतचा अन्याय आता थोडा कमी झालेला दिसतो. आता असे कोणते क्षेत्र आहे की, तेथे महिला नाहीत? न्यायिक विभाग, महसूल खात्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पोलिस खात्यात सर्वोच्चपदी महिला आहेत. रिक्षाचालक, टॅक्‍सी ड्रायव्हर, रेल्वे इंजिन ड्रायव्हर, विमानचालक, बस कंडक्‍टर, तसेच विविध क्षेत्रांत अधिकारीपदी, सर्वोच्चपदी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात महिला अग्रेसर आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रपती, पंतप्रधान, या पदावर देखील महिला आरूढ झाल्या आहेत. एवढा पराक्रम त्या करू शकतात; मग त्या मुक्ती कोणापासून मागतात? तर या सर्व क्षेत्रात काम करत असताना त्या दुहेरी भूमिका निभावतात आणि अशा वेळी त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम रूढी, परंपरा करत असतात. महिलांना मुक्ती हवी ती बुरसटलेल्या रूढी परंपरांपासून वखवखलेल्या नजरांपासून, सासू, सून, नणंद, भावजया, त्यांच्या आया इत्यादी छळवादी महिलांकडून. स्त्री ही पुरुषाइतकीच स्वतंत्र आहे.

समजा कुटंबात एक मुलगा, एक मुलगी असेल तर आई मुलीला सांगते, बाई गं, तुझे हे काम आहे, आता हुंदडणे बंद कर. जरा स्वयंपाक -पाण्यात लक्ष घाल. घरकामाचं बघ. मुलाला मात्र यातील काहीच आई सांगत नाही तिचे बंधन फक्त मुलीला; मुलाला नाही. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती कोण चालवते ? मुलीला गौण आणि दुय्यम स्थान स्त्रीच बहाल करत असते. संस्कार करायचे, शिस्त लावायची तर मुलगा मुलगी दोघांनाही सारखीच लागली पाहिजे. कामाची वाटणी समान झाली पाहिजे. हे चक्र कुटुंबापासून पुढे जाईल.अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. म्हणजे कुटुंबापासून सुरुवात केल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक कुटुंब आहे. यातून कामाच्या समान वाटणीची समाजाला सवय लागेल. ती आपल्या प्रत्येक घरातून लागणार आहे. याचे आपण भान ठेवले पाहिजे. स्त्री-पुरुष आचार-विचार, संस्कारात समानता आणणारी स्त्रीमुक्ती हवी आहे...

स्त्रियांच्या मनावर, बुद्धीवर, रूढी परंपरेचे, पुरुषप्रधान संस्कृतीचे थरच्या थर साठलेले आहेत. ते अगोदर गळून पडायला हवे. स्त्री-मुक्ती चळवळींनी काही गोष्टींचा नको तेवढा विपर्यास केला, अतिरेक केला. उदा. कुंकू, बांगड्या, साड्या किंवा अन्य पारंपरिक वेशभूषा, केशभूषा झिडकारणे आणि शर्ट पँट घालून बॉयकट करून पुरुषी वागणे म्हणजे स्त्री-मुक्ती, अशी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला गेला. मुलगी म्हणून जन्माला येणं हे काही स्त्रिच्या हाती नाही. पण पुढे वंश चालू राहायचा तर मुलगी म्हणजे स्त्री हवीच. आईलाच आपल्या स्त्रीत्वाचा विसर पडावा अन्‌ पोटी मुलगी जन्माला येऊ नये याचा खटाटोप तिनं करावा, यापेक्षा स्त्रीजातीचा मोठा अपमान कोणता असेल? स्त्रीचा उभा जन्म अनेक बंधनात अडकलेला असतो. आता खरी गरज आहे, स्त्रियांनी आत्मपरीक्षण करण्याची, त्यांच्यात भरपुर ताकद आहे, ही पुरुषप्रधान संस्कृती संपविण्याची, पण त्याकरिता स्त्रियांनी आपली मानसिकता बदलायला हवी, आणि स्त्रि मुक्तिची चळवळ योग्य दिशेने न्यावयास हवी.

No comments:

Post a Comment