विचार करा
सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य आहे.
एक अतिशय अनमोल दागिना स्त्रिया फ़ारच कमी वापरतात तो म्हणजे मौन.
परमेश्वर जेव्हा शिकाऊ होता तेव्हा त्याने पुरुष निर्माण केला व तरबेज झाल्यावर त्याने निर्मिलेली कलाकृती म्हणजे स्त्री.
स्त्रीला सांभाळण्याचा फ़क्त एकच मार्ग आहे, आणि तो कुणालाच माहीत नाही.
वरील वाक्ये वाटतात लहान पण आयुष्याचा अर्क त्यात सामावलेला आहे. आजची परिस्थिती, वास्तविकता व वरील वाक्ये यात बराच विरोधाभास आहे. स्त्रीची अनेक रुपं आहेत, मग ती, आई, मुलगी, बहीण, पत्नी, नणंद, भावजय ( जाऊ ), सासु, मावशी, आत्या, आजी इत्यादी. अश्या अनेक रुपाने स्त्रीने समाजमन व्यापुन टाकले आहे.
वरील वाक्यांचा भावार्थ लक्षात घेता स्त्रीची अनेक रुपं उलगडल्या जातात. आज समाजामध्ये आई-वडील-मुलगा, सासु-सासरा-सून, पती-पत्नी, आजी-आजोबा-नातु/नात यांच्यातील विसंवादाचे दर्शन प्रामुख़्याने घडत आले आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण ? उत्तर एकच "स्त्री". स्त्री ही पुख़राज ख़ड्याप्रमाणे असते, एकतर आबाद करते नाहीतर बरबाद.
आजकालच्या कौंटुबिक दृश्यामुळे स्त्री ने स्त्रीलाच बरबाद करण्याच्या कितीतरी घटना बघावयास मिळतात. पुर्वीच्या काळी मुलीचा जन्म नकोसा असायचा. पण आजही परिस्थितीत विशेष फ़रक पडला नाही. एकीकडे जगदंबा, रेणुका, तुळजाभवानी यांची भावभक्तीने पुजा करायची व दुसरीकडे मुलीचा जन्म स्वागतार्ह मानायचा नाही. असे दुभंगलेले समाजजीवन किती दिवस जगायचे. पुरुषाने स्त्रीवर बळजबरी, अत्याचार केले तर त्याला नराधम म्हणायचे मग स्त्रीने स्त्रीवर केलेल्या अत्याचाराला काय म्हणणारं ? उत्तर अगदीच अवघड आहे. आजवर अनेक सामाजिक संस्था स्त्रीवरील अत्याचारासाठी हिरीरीने कार्य करीत आहे पण स्त्रीने स्त्रीवरील केलेल्या अत्याचाराला कुठेही तोंड फ़ुटलेले नाही. समाजाची संवेदनाचं जणु हरवुन गेलेली आहे.
आजपावेतो सगळीकडे सासुने, पतीने, सास-याने स्त्रीवर केलेल्या अत्याचाराबद्द्ल चर्चा सुरु होती. आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रुण हत्या, बलात्कार, छळवणुक याची सजीव उदाहरणे आहेत. परंतु स्त्रीवर्गातील एक घटक जो कायम वृद्ध मातापित्यांवर अत्याचार करीत आहे त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. केवळ असेच घडत नाही की सासुच तिच्या सुनेचा छळ करते. आज अशीही उदाहरणे आहेत की सुनांच्या छळवणुकीमुळे स्त्री तिचे मातृत्व व पुरुष त्याचे पितृत्व हरवुन बसला आहे.
मध्यंतरी, "बागबान", "तु तिथं मी", "आई", हे हृदयस्पर्शी चित्रपट येऊन गेलेत. हे चित्रपट बघताना वृद्ध मातापित्यांच्या भावना उचंबळुन आलेल्या मी पाहिल्या आहेत. ते चित्रपट फ़क्त आलेत आणि गेलेत. पण दुर्दैवाने वास्तविकता वेगळी आहे. आज समाजात असे अनेक वृद्ध मातापिता आहेत ज्यांचा शेवट नक्कीच "बागबान" किंवा "तु तिथं मी" सारख़ा होत नाही. आता तुम्ही म्हणालं की या वृद्धांसाठी अनेक वृद्धाश्रम आहेत, त्यांचे उर्वरीत आयुष्य तिथे सुलभरित्या जाईल पण ज्यांनी आपल्या अपत्यासाठी, अनेक हाल-अपेष्टात जीवन काढले त्यांच्या शेवटच्या काळात अशी उदासीनता त्यांच्या नशीबी यावी, यालाच दुर्दैव म्हणतात. सभोवतालच्या वृद्ध मातापित्यांवर कोसळलेल्या आभाळाकडे पाहुन मेंदु विटल्यासारख़ा झाला आहे,
आजकालच्या पिढीतील काही अपत्ये आईवडीलांचे ॠण मान्य करतात परंतु वेळ आली की, त्याला सोयिस्करपणे कर्तव्याचा साज चढवुन त्यांना दु:ख़ देण्यास मोकळी होतात. आपण दररोज पेपर, बातम्यात ऐकतो की, सासुने सुनेचा छळ केला, या प्रकाराला बहुतांशी प्रसिद्धी दिली जाते पण त्याचबरोबर सुनांकडुन सासु-सास-यांना होणा-या छळाची कुठेही वाच्यता केली जात नाही. सासुरवासा इतक्याच सुनवासाच्या घटना घडत आहेत.
कायद्यात कलम १२५ फ़ौजदारी प्रक्रिया संहितेत, बायको, मुलगा, वृद्ध मातापिता यांच्या उदरनिर्वाहाची तरतुद आहे. परंतु स्त्रीला तिच्या पतीकडुन पोटगी मिळण्याकरीता या कलमाचा जेवढा उपयोग झाला त्याच्या निम्म्याहुन निम्मा उपयोग वृद्ध मातापित्यांच्या पोटगी साठी झाला नाही, यावरुन वेगळे दुर्दैव ते काय !
काही वास्तववादी घटना नाट्यप्रवेशाच्या माध्यमातुन खालीलप्रमाणे मांडत आहे.
प्रवेश पहिला :
स्थळ : नर्सिंग होम.
वातावरण : प्रसन्न
आई :- नको रे बाबा अश्या येरझा-या घालु. सगळं काही व्यवस्थित होईल बघं.
मुलगा :- ते सर्व ठीक आहे आई, पण मला तुझ्या सुनेच्या प्रसववेदनांचे आवाज सहन होत नाही. मी देखील माणुस आहे शेवटी. काय करू ?
आई :- हो रे बाळा तुला देखील गुलाबासारखा टपोरा मुलगाच होईल बघ.
मुलगा :- हो गं आई आशा तर तीच आहे बघुया काय होतंय ते.
नर्स :- अभिनंदन, तुम्हाला गोड मुलगी झाली.
मुलगा :- हुं
आई :- अरे देवा, तुझ्या नशिबी टपोरा गुलाब होता ही शेवंती कुठुन आली. भोग तुझ्या बायकोच्या कर्माची फ़ळं दुसरं काय.
प्रवेश दुसरा :
प्रसंग : औक्षवाणाचा
आजी :- आत्या घ्यानं तुम्ही ओवाळुन माझ्या नातवाला
आत्या :- अगं हो, पण पहिला मान तुमच्या सुनेचा, तिला आधी करु द्या औक्षवाणं
आजी :- काय वेड लागलं क तुला. ती कसली ओवाळते कुळबुडवी मेली. पहिल्या मुलीची आई आहे ति मुलाची नाही.
प्रवेश तिसरा :
स्थळ : प्रदर्शनात फ़िरताना
मुलगा :- बाबा मला तो महाराजाचा ड्रेस घेऊन पाहिजे.
बाबा :- तुझ्या आईला विचार
आई :- अहो त्यात विचारायचं काय, चला घेऊ या. किती राजबिंडा दिसेल माझा सोन्या तो.
मुलगी :- आई मलासुद्धा तो बार्बीचा ड्रेस घेऊन पाहिजे.
आई :- शांत बस. करायचाय काय तुला बार्बीचा ड्रेस. आत्ता मागच्याच दिवाळीत घेतला न तुला ड्रेस.
प्रवेश चौथा :
स्थळ : घर
वेळ : संध्याकाळी ७ वाजता.
मुलगा :- आई मी बर्थडे पार्टीला जातोय गं. यायला उशीर होईल.
आई :- किती पर्यंत येशील रे बाळा ?
मुलगा :- आई, १२ तरी वाजतील.
आई :- ठिक आहे जास्त उशीर झाल्यास तिकडेच थांब हो.
थोड्यावेळाने
मुलगी :- आई मला खुप भुक लागलीय, जेवायला वाढं.
आई :- या, किती वाजले ? ९.३० ? ही काय घरी यायची वेळ झाली?
मुलगी :- अगं आई. माझा क्लासच ९ ला सुटतो. क्लासनंतर थोडावेळ बोलत बसले आणि घरी आले.
आई :- तुझ्या मास्तरला काय पोरीबाळी नाहीत वाटतं. आणी स्वयंपाकात घरकामात मदत केव्हा करणार रात्री ९:३० वाजता ?
मुलगी :- अगं पण आई, माझा क्लासच ९ ला सुटतो.
आई :- मग काय, तुला ओवाळु ? काही पण नाही आणि बिण नाही. दिवेलागणीच्या वेळी घरी आलंच पाहिजे. सांग तुझ्या सरांना वेळ बदलायला. नाहीतर बंद कर तुझा क्लास. करायचंय काय एवढं शिकुन.
प्रवेश पाचवा :
स्थळ : घर
प्रसंग : नुकतंच सास-याचे दु:खद निधन झालेले आहे. त्यानंतरचा ८ वा दिवस.
सुनबाई :- आई, आता बाबा तर गेले. आता तुम्ही आपल्या तब्येतीकडे नीट लक्ष द्यायला पाहीजे.
सासुबाई :- हो गं पोरी, आता तुमच्या शिवाय मला तरी कोण आहे.
सुनबाई :- हो न ते तर आहेच.
सासुबाई :- बाकी काय तुला काही हवंय का ?
सुनबाई : आई काही नको. तुम्ही खुप काही दिलंय. फ़क्त मला विचारायचंय की आता तुम्हाला या मंगळसुत्राचा काय उपयोग. त्याला तोडुन मला पोहे हार करायचा आहे. मला ते द्यालं?
सासुबाई :- (रडत रडत) सर्व तुझंच आहे मुली, एवढे १५ दिवस होऊ दे मग बघु.
मुलगा :- आई ती म्हणते ते अगदी बरोबर आहे. करायचंय काय तुला ह्या मंगळसुत्राचं. त्यापेक्षा दोन्ही मुलांना चांगले गोफ़ तयार करता येतील.
या सर्व घटना आपल्या जवळपास घडत आहे परंतु आपण निर्विकारपणे सहन करत आहे. या घटनांचा प्रत्यक्षदर्शि मुलगा निमुटपणे बघत त्याला दुजोरा देत आहे. प्रत्येकाच्या संवेदनाच जवळजवळ मॄत पावल्या आहेत.
marathi
No comments:
Post a Comment