मराठी कॉर्नर सभासद

Sunday, November 8, 2009

हे जपण्याचा प्रयत्न करा

हे जपण्याचा प्रयत्न करा

आई आणि वडील रात्री खुप उशीरा कामावरून येतात. दोघेही थकलेले आणि त्रस्त झालेले असतात. त्यांचा ६ वर्षाचा मुलगा त्यांची वाट पहात दाराजवळ बसलेला असतो.

मुलगा :- आई बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू ?

वडील :- हो अगदी, निसं:कोचपणे.

मुलगा :- बाबा तुम्ही किती पैसे कमाविता ?

वडील :- हा काय प्रश्न आहे?

मुलगा :- आई तु किती पैसे कमाविते?

आई वडील :- अरे पण तुला काय करायचंय त्याचं ?

मुलगा :- मला फ़क्त जाणुन घ्यायचंय. कि तुम्ही दोघे एका तासाला किती पैसे कमाविता? आई (चिडुन) :- १०० रुपये

मुलगा :- आणि बाबा तुम्ही ?

वडील (रागावुन) :- २०० रुपये.

मुलगा थोडावेळ विचार करून : बाबा मला तुम्ही १०० रुपये द्याल?

वडील (चिडुन) :- तुला जर कुठलेही फ़ालतु खेळणे विकत घ्यायचे असेल तर गप्प बस. आणि मुकाट्याने आपल्या खोलीत जाऊन अभ्यास कर नाहीतर झोपायला जा. माझं डोक उठवू नकोस.

मुलगा :- आई तु तरी मला १०० रुपये देशील ?

आई :- आता बर्‍याबोलाने खोलीत जातो कि एक फ़टका पाहिजे. मुलगा शांतपणे आपल्या खोलीत निघुन जातो. आईवडील जेवायला बसतात आणि एकमेकांना मुलाच्या वागण्यावरून नाही नाही ते बोलतात. थोड्यावेळाने दोघेही शांत होतात आणि विचार करतात कि त्यांचा मुलगा काही कारण असल्याशिवाय असे पैसे मागणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असेल. असे म्हणुन त्याच्या खोलीकडे जातात.

वडील :- का रे झोपलास का ?

मुलगा :- नाही बाबा जागाच आहे. का?

आई :- काही नाही रे आम्ही मघाशी तुझ्यावर विनाकारण चिडलो.

वडील :- आम्ही आमच्या ऑफ़िसचा राग तुझ्यावर काढला.

मुलगा :- जाऊ द्या ना बाबा.

वडील :- नाही ते काही नाही, हे घे तुला १०० रुपये पाहीजे होते ना.

(असे म्हणुन मुलाला १०० रुपये देतो) मुलगा आनंदाने त्याच्या पुस्तकामध्ये ठेवलेले पैसे काढतो. ते बघुन आईवडीलांचा राग अनावर होतो. तो लहान मुलगा त्याचे जवळचे पैसे मोजतो आणि छानंसं हसतो. ते पाहुन वडील अजुनच चिडतात.

वडील :- जर तुझ्याजवळ एवढे पैसे होते तर आम्हाला मागायची काय गरज होती?

मुलगा :- कारण माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते.

आई :- पण एवढ्या पैश्यांचं तु काय करणार आहे. काही नाही तुला आता फ़टकावलाच पाहीजे.

मुलगा :- थांब आई मला मारू नकोस. आई हे घे १०० रूपये आणि बाबा हे घ्या २०० रूपये. आता मी तुमचा एक तास विकत घेऊ शकतो का? प्लीज उद्या तुम्ही दोघे ही लवकर घरी या. मला घरी एकटं राहून कंटाळा आलाय, मला तुमच्यासोबत खेळायचंय आणि जेवायला जायचंय.

आईवडील त्या मुलाला बिलगुन ढसाढसा रडायला लागले.

या कथेतुन बोध :

ज्याच्यांवर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासोबत चांगला वेळ तुम्ही घालवत चला. जे आईवडील त्यांच्या जीवनात कष्टाने काम करीत आहे. त्यांच्यासाठी ही एक प्रांजळ सूचना. आपल्या हातातुन अशी वेळ सुटु देऊ नका. तुमच्या जीवनात ज्यांचे मोलाचे स्थान आहे त्यांच्या सोबत ती वेळ तुम्ही सत्कारणी लावा. जर उद्या आपला मॄत्यु झाला तर ज्या ऑफ़ीससाठी आपण अहोरात्र काम करतो त्या ऑफ़ीसला तुमच्या जागी दुसरा व्यक्ती काही दिवसात मिळेल. पण आपली जी जिवाभावाची लोकं आहेत त्यांच्या जीवनात आपल्या जाण्याने होणारी उणीव कधीच भरून निघणार नाही. विचार करा. कुणालाही गॄहीत धरू नका. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना तुमच्या जवळ धरून चला. कारण एकेदिवशी तुम्ही उठाल आणि तुम्हाला जाणवेल की काही दगडं शोधण्याच्या ध्यासात तुम्ही हातातील हिरे गमावुन बसला आहात.

No comments:

Post a Comment