मराठी कॉर्नर सभासद

Friday, September 10, 2010

सांग ना का परत येऊ मी ?

तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, की तू आणि बाबांनी माझ्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या, मला उत्तमोत्तम शिक्षण दिलं, परदेशात शिकायला पाठवलं, माझ्या पायावर मला उभं केलं, पण आज तुमच्यामुळे जे मी शिकू शकलो त्याचा काहीतरी उपयोग भारतात होतो का, तूच सांग मला साधी नोकरी तरी मिळेल का? मग सांग ना का परत येऊ मी ?

आज तुझी सून मारिया जरी अमेरिकन असली तरी, तिने तू सांगितल्याप्रमाणे आपल्याकडील सर्व चालीरीती शिकून घेतल्या ना. तूच म्हणतेस की भारतातील मुलीने हे सर्व शिकण्यासाठी नाक मुरडलं असतं पण मारियाने अगदी आवडीने सर्व शिकून घेतलं नव्हे ती त्यात पारंगत झालीय. मग सांग ना का परत येऊ मी?

आज इथे बाबांच्या प्रकृतीची नीट काळजी घेण्यासाठी उत्तमोत्तम दवाखाने आहेत, निष्णात तज्ञ आहेत, त्यांचा दमा कुठल्याकुठे निघून गेला, तुझीपण तब्येत छान झालीय, आज मारियाचे बाळंतपण जवळ आल्यावर तू म्हणतेस की भारतात ये, इथे करू बाळंतपण, पण मी म्हणतोय की, बाळाचा जन्म इथे अमेरिकेत झाला तर आपल्या कुटुंबातील ते पाहिलं बाळ असेल की ज्याला अमेरिकेचे नागरिकत्वाचा अधिकार मिळेल, वर सर्व बाबींचा विचार करता, सांग ना का परत येऊ मी?

आई, आज तुमच्यामुळे जे यश मी अनुभवतो आहे, त्याचा उपभोग घेण्यासाठी तरी तुम्ही दोघेही इथे या? अगं तू म्हणतेस की इथे बाबांचं मन लागत नाही, तू म्हणतेस की इथे तुमच्या दोघांना इथे बोलायला कुणी नाही मग आम्ही दोघे नाही आहोत का? आणि आता आपल्याकडे एक बाळ येणार तरी कुणीच नाही, एकट एकट वाटतं असं कस म्हणतेस?

आई मला माहितीय की आपले सर्व नातेवाईक तिथे भारतात आहेत, पण तूच सांग कितीसे आपल्याकडे येतात आणि आपण तरी कुठेकुठे जातो, ते आहेत तिथे पण फक्त निमित्ताला, एरवी तुम्ही दोघेही तिथे एकटेच असताना, तुम्हाला तसं पाहून माझा जीव कासावीस होतो त्याचं काय, ते काही नाही मला तुमच्यासोबत राहायचंय, तुमची सेवा करायची आहे, इथल्या आणि तिथल्या गोष्टींमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. तुम्ही इथे आले की तुमच्या दोघांच्या तब्येती किती छान असतात, मला तुम्हा दोघांना अगदी सुखात पहायचंय, तुम्ही तिथे असला तर माझा जीव टांगणीवर असतो, सारखी हुरहूर लागून असते तरी तू सारखी मलाच समजाविण्याचा प्रयत्न करतेस, सांग ना तुम्ही दोघांनी माझ्यासोबत रहाव हि माझी इच्छा असताना सांग ना का परत येऊ मी?

बर आता तुला महत्वाचं सांगतोय, मागल्या वेळी मी जेव्हा भारतात आलो तेव्हा केवळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी दोन तीन जागी अर्ज करून पाहिला होता, पण उपयोग काय, मी जे इथे शिकलो त्या गोष्टीच मुळात भारतात माहिती नाही, तितकं तंत्रज्ञान तिथे विकसित झालं नाही, त्यावर मी स्वत:चा व्यवसाय करायचा म्हणून बँकेत कर्ज मागण्याकरिता गेलो तेव्हा मला २ लाख रुपयांची लाच मागण्यात आली, महामंडळात जागेसाठी अर्ज केला तिथे पण तेच उत्तर, तूच सांग, मी जे शिक्षण इथे घेतलं त्या शिक्षणाचा उपयोग तिथे करायचा म्हटलं तर तेथील लोकांना आणि पर्यायाने सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. जर माझ्या शिक्षणाचा इतकाच त्रास मला तिथे होतोय तर सांग ना का परत येऊ मी?

मी आणि मारिया तिथे बस्तान मांडण्याच्या दृष्टीने कितीतरी लोकांना, शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या पण जिथे तिथे भ्रष्ट लोकं बसली आहेत, नवीन काही सुरु करतो आणि रोजगाराची संधी उपलब्ध करतो म्हणतो तर तेथील अधिका-यांना तेच नेमकं नकोय, आता केवळ तुझ्या म्हणण्यानुसार तिथे येऊन राहायचे तर केवळ घरीच बसून राहावे लागेल, ते चालेल तुला? मग मला इतकं शिक्षण देऊन मोठ केलसं त्याचा काय उपयोग? तेव्हा तूच सांग ना का परत येऊ मी?

आज माझेजवळ सर्व सोयींयुक्त घर आहे, तुम्हाला नुसतं बसून रहायच आणि तुमची सेवा करू देण्याची संधी मला द्यायची आहे, ज्या परिस्थितीतून तुम्ही आलात त्या परिस्थितीवर मात करून मला यशस्वी केलं त्याची फळे चाखायला तरी तुम्ही माझ्यासोबत असावयास हवं. आज तुझ्या मुलाची अमेरिकेत स्वत:ची कंपनी आहे, विश्वाची सारी सुखं पायाशी लोळण घेत आहे, निदान तुझ्या मुलाचा उत्कर्ष तरी बघायला तुम्ही इथे या. तुझी सून तू सांगितल्याप्रमाणे सर्व सणवार करेल, आपलं घर आनंदाने भरून जाईल निदान या आनंदासाठी तरी तुम्ही दोघेही इथे या.

मी आज इथे ज्या पदावर आहे, ज्या उंचीवर आहे, त्याचा उपयोग तिथे भारतात नाही, माझ्या शिक्षणाचा तिथे कुणालाही फायदा नाही, किंवा तसा उपयोग करून घ्यावयाचा नाही, तशी संधी तिथे नाही, तिथे नियोजनच नाही, त्यामुळे अश्याठीकाणी येण्याचे कसे काय औचित्य असू शकते.

आणि या माझ्या कळकळीच्या विनंतीनंतरहि तुला असं वाटतंय की मी तिथे यावं तर निदान एक तरी चांगल कारण मला दे, मी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार आहे, पण जर या सर्व गोष्टी तिथे घडणारच नसतील तर तूच सांग ना, का परत येऊ मी?

No comments:

Post a Comment