मराठी कॉर्नर सभासद

Sunday, May 20, 2012

एकदा हे करून तर पाहू


एकदा हे करून तर पाहू


शु s s s s s s s s s ssssssssss  बा sssssssssssssssssss स्स्स, बास्स.............      खूप झालं....................................... खूप ऐकून घेतलं...... आता बास..........

मी, मी आहे म्हणून का एवढं सहन करू, आणि किती सहन करू, सहनशक्तीला पण काही मर्यादा असतात, मर्यादेला पण काही सीमा असतात.  आता मी बोलणार, आणि काय हो ? का बोलू नये मी,..... मी बोलणार आणि तुम्हाला ऐकावंच लागेल.   

झालं परत एकदा मनामनात द्वंद्व सुरु झालं.  आज परिस्थितीच अशी उद्भवली आहे कि मनाचे कितीतरी भाग झालेत आणि डोक्याचा अगदी भुगा होऊन गेलाय.  त्यातच अण्णा म्हणतात कि भ्रष्टाचार करू नका.  का करू नका ?   प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी अडकल्या आहेत, किंबहुना त्या तश्या अडकवून ठेवल्या आहेत, शे-पाचशेची चिरीमिरी दिल्याशिवाय ही साधी सरळ कामेसुध्दा  होणार नाही.  अण्णांना काय जातंय सांगायला.

खूप विचार केला आणि विश्वासाने सांगतोय तुम्ही सर्व ऐकून घ्या, या देशाचं काहीही होणार नाही, जसं आहे तसं सुरु राहू द्या त्यातच सगळ्यांचं भलं आहे.  आणि मी म्हणतो कशाला या नसत्या उठाठेवी करायच्या, पूर्ण यंत्रणा बुडालेली आहे, मी एकट्याने भ्रष्टाचार थांबवला तर त्याचा समूळ नाश थोडीच होणार आहे.  

आज मुलाचा जन्म झाला, नोंदणी झाली, पण जन्माच्या दाखल्यात नावाच्या ठिकाणी मुलगा असं लिहिलंय. मग बरोबर आहे ना, तुम्ही कायद्याप्रमाणे जन्माच्या सात दिवसांच्या आत जन्माची नोंदणी केली, मग त्यात नावाच्या रकान्यात मुलगा असंच लिहिणार ना. कायद्याला कुठे कळतंय कि मुलगा झाल्यावर बाराव्या दिवशी बारसे करतात आणि मग नांव ठेवतात.   आणि तो पर्यंत नोंदणी थांबवली तर कायद्याचा बडगा नाकी नऊ आणतो.  पण हे सर्व सांगेल कोण आणि समजावेल कोण ?  तर महत्वाचा मुद्दा, जन्माच्या दाखल्यात नांव लिहावयाचे आहे, दोनशे रुपये दिले तर ३ दिवसात ३ प्रतीत नांव घालून मिळेल.  काय म्हणता, अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक छदाम देणार नाही ! राहिलं, उद्या या हा अर्ज करा, प्रतिज्ञापत्र पत्र द्या, बारश्याची पत्रिका लावा, दोन साक्षिदाराचे प्रतिज्ञापत्र द्या आणि १५ दिवसांनी या, मग पाहू काय करायचे आहे, सगळं काही नियमानुसार होईल पण केव्हा होईल ते सांगता येत नाही.  काय मंडळी काय करू, अण्णांना बोलाऊ, कि देऊन टाकू दोनशे रुपये?

मुलगा शाळेत गेला, मग महाविद्यालयात, मग नौकरी, मग लग्न, मग संसार, रेशन कार्ड, वैद्यकीय दाखला, पॅन कार्ड, ओळखपत्र, मग त्यांची मुलं आणि परत पहिले पाढे पंचेवीस...... किती वेळा अण्णांना उपोषणाला बसविणार, मी काहीच करू नये. पण काय करू शकतो मी ? काहीच नाही ? हॅ हे काय जगणं झालं ? नाही पण मी काही तरी नक्कीच करणार काय करू ? काही सुचत नाही, कुठून सुरुवात करू. कुणी तरी मार्गदर्शन करा.

कसलं मार्गदर्शन मागताय काही मिळणार नाही, जे आहे ते मुकाट्याने सहन करायचं आणि दिवस भरले कि एके दिवशी मरून जायचं.  पण काहो, खरंच काहीच मार्ग नसेल ? केवढी ही दुर्बलता, हताशा, हतबलता. आणि ते ही स्वतंत्र भारतात.  नक्कीच काही तरी मार्ग असेल. आपण शोधू म्हणजे सापडेल.

आपण असं करू पुढील निवडणुकीत सगळ्या म्हणजे अगदी सगळ्या लोकांना सांगू कि मतदान करा, तो तुमचा हक्क आहे.  अगदी १००% मतदान झालंच पाहिजे मग बघुया कशी यंत्रणा ठीक नाही होत ते.  पण काहो मतदान करायचं म्हणजे निवडणुकीच्या दिवशी... हो हो त्याच दिवशी ज्या दिवशी सार्वजनिक सुटी असते, त्याच दिवशी मत द्यायचं.  पण कुणाला ? कारण फार तर फार १० टक्के सोडले तर सगळीकडे सारखीच लोकं आहेत. मग का करायचं मतदान.  कारण मतदान केलं कि परत हेच ९० टक्के लोकं येणार आणि परत ये रे माझ्या मागल्या.   मग काय हो ? करायचं ना मतदान १०० टक्के. हो हो. पण मतदान असं करायचं कि १० टक्क्यांमधून १०० टक्के लोकं निवडणुकीला उभे करायचे आणि त्यांना निवडून आणायचं.  होईल हे सर्व ? जमेल हे सहज ?  हो हो, का नाही जमणार, एक दिवस असा येईल कि निवडून येण्या-या १०० टक्के लोकांमध्ये कुणीही ९० टक्क्यामधील माणूस प्रतिनिधित्व करणार नाही.  सगळे कसे निरभ्र, स्वच्छ.  आणि मग सुरु करायची यंत्रणेची साफसफाई.  ती जाहिरातीतली बाई नाही का एकदाच रीनने घासते आणि इतरांचे कपडे पिवळे दिसतात. खालच्या वर्गापासून तर वरच्या वर्गापर्यंत सर्वत्र साफसफाई.  आम्हाला देश चालवायचा आहे पक्ष नाही.  फार तर फार निवडणुकीच्या वेळी आम्ही पक्ष-पक्ष खेळू, पण एकदा का निवडणुकीचा निकाल लागला कि पक्ष गेले उडत आम्ही सर्व भारतीय, भारत देश चालवू. अगदी कायद्याने.  संपूर्ण निवडून आलेल्या लोकांचे सर्वसमावेशक शासन देशावर राज्य करेल. ते देशवासियांचे, देशवासीयांनी, देशवासियांकरिता चालविलेले राज्य, रामराज्य.  आणि तुम्ही खात्री बाळगा असं नक्की होणार.  हवी तर मी खात्री देतो. 

मग सर्वप्रथम देशाच्या काना-कोप-यात चाललेल्या घडामोडीचा सखोल अभ्यास करू आणि त्याप्रमाणे कायदे तयार करू. हो हो, नव्याने तयार करू. त्या कायद्यामध्ये कुणा एका साठीही पळवाटा नसतील.  गुन्हेगाराला शासन होईल, हो हो अगदी त्याच्या हयातीतच होईल.  मग कुणी एकमेकांना वाचविण्यासाठी नैतिकतेचा बाजार मांडणार नाही, द्वेषपूर्ण चाली खेळणार नाही. 

मग जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात शे-पाचशे ची चिरीमिरी द्यावी लागणार नाही. तशी यंत्रणाच राहणार नाही.  अण्णांना त्रास होणार नाही, किंबहुना असल्या उपोषणाची गरजच भासणार नाही.  त्याकरिता फक्त एक मला करावं लागेल, मला माझी मानसिकता बदलावी लागेल.  लाल दिवा लागल्यावर मला थोडं थांबायची सवय करावी लागेल. जास्त नाही फक्त एक मिनिट कारण त्यानंतर माझ्यासाठी परत हिरवा दिवा लागलेला असेल.  अरे तो तसा नेहमीच लागतो, फक्त मला वेळ नसतो, मुलखाची घाई झालेली असते, पण मी यानंतर तो एक मिनिट अगदी गाडी बंद करून थांबेन, परत दिवा हिरवा होण्याची वाट पहात. 

जाऊ द्या काहीतरीच काय, कसल्या स्वप्नरंजनात आहात तुम्ही. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्या प्रमाणात वागायचं ? जमणार नाही........... तुम्ही तुमच्या जागी शहाणे आणि आम्ही आमच्या जागी.

आज देशात काय चाललंय पहा, जरा डोळसपणे बघायला शिका.  ज्यांच्या हातात शक्ती असते ते शक्तीचा वापर, गैरवापर कसाही करू शकतात, तुम्ही त्यांचे काही पण वाकडे करू शकत नाही. एकामागून एक घोटाळे झालेत, काय केलं तुम्ही, समिती आणि त्यांच्या बैठका, उपयोग काय शून्य, तुम्हाला स्वप्नांत राहण्याची सवय झाली आहे.  आज हतबलतेने कळस गाठलेला आहे. सगळीकडे नैराश्य आहे, संवेदना मृत पावल्या आहेत आणि तुम्ही काय घेऊन बसलात. म्हणे रामराज्य. हॅ.

तेच तर तुम्हाला कळत नाही. नियोजन, योग्य रीतीने नियोजन केलं तर सर्व काही शक्य आहे.  आता हेच बघा, मुल जन्माला येण्यापूर्वी मुलगा किंवा मुलगी होईल या अंदाजाने आईवडील बाळाचे नांव आधीच पक्के करतात, फक्त त्यावर बारश्याच्या दिवशी शिक्कामोर्तब करतात.  मग, कायद्याप्रमाणे नोंदणी करताना ते नांव अर्जात लिहायचे जेणेकरून बारश्याच्या आधीच जन्माचा दाखला नावासकट हातात पडेल. किती कष्ट पडलेत हे सर्व जमवून आणायला, कशाला द्यायचे दोनशे रुपये.  पण नाही तुम्ही सवयीचे गुलाम.  बघा बघा मी सांगतोय तसं करून बघा.

निवडणुकीत निवडून आलेल्या १०० टक्के लोकांमधून मग ते कुठल्याही पक्षाचे असो राज्य करायचे तसे त्यांचेकडून करवून घ्यायचे. राज्यकारभारात प्रतिनिधित्व प्रत्येक निवडून येणा-याला द्यायचे मग तो कुठल्याही पक्षाचा असो.  शेवटी तुम्हाला संपूर्ण देशवासियांचे, देशवासीयांनी, देशवासियांकरिता चालविलेले राज्य प्रस्थापित करायचे आहे.  संविधानात असे कुठे म्हटलेय कि अमुक एका पक्षाचेच राज्य राहील आणि अमुक एक पक्ष विरोधी गटात राहील.  निवडणुकीनंतर येणारे राज्य हे सर्वसमावेशक असेल, मग त्यात, पक्ष, जात, रंग, भेद, उच्च, नीच, धर्म या सर्वांचे प्रतिनिधी असतील, मग कोण कुणाच्या उणीदुणी कशाला काढेल. आणि समजा काढलेच तर जनता त्याला योग्य जागा दाखवेल.  किती दिवस आपण स्वत:ला निर्बुद्ध समजायचे आणि तसे समजू द्यायचे.  आता पर्यंत तसे समजू दिले आणि किती नुकसान आपण स्वत:चे करून घेतले.  अहो ६५ वर्षात अगदी पिढ्या निघून जातात, निसर्गाचे एक अख्खे चक्र पूर्ण होते, आणि आपलीच प्रगती होऊ नये.  देशाभिमान आणि स्वाभिमानाला चांगले खतपाणी घाला मग बघा कसे सोन्यासारखे पिक येते. 

कसं आहे ना, थोडी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तेवढी बदला... शब्दाचा मान महत्वाचा.  भारतीयतेसमोर कसली आलीय जात आणि धर्म, उच्च आणि नीच, गरीब आणि श्रीमंत, राजा आणि रंक, या दुहीमधील कुणीही उच्च वर्गाचा असला म्हणून कानाने खात नाही ना. प्रत्येकाला निसर्गाच्या चाकोरीतुनच जावयाचे आहे. त्याच्या समोर कुणाचेही चालत नाही.  आता नेमकं काय होतंय कि प्रत्येकाला स्वर्गात जायचं आहे पण मरायला कुणी तयार नाही.  त्यामुळे आता प्रत्येकाला मरावंच लागेल आणि तेव्हाच स्वर्ग दिसेल. 

थोडं थोडं कळतंय पण पूर्णपणे पटत नाही.  तुमचा खूप विश्वास आहे असं दिसतंय खरं पण काहो असं होईल. तुम्हाला तरी वाटतंय का ?  झालं झालेत ना आडवे, अहो विचार आधी प्रगल्भ करा. तुम्हाला नकारघंटाच वाजवायची सवय.  इकडे कळतंय म्हणता मग रुजवा ना. हं थोडासा त्रास होईल पण शेवटी फायदा सगळयांना. 

अनुशासन हा एक महत्वाचा मुद्दा.  मला वाटतं कि घरातल्या प्रत्येकाने किमान एक वर्ष देशाची सेवा मिलिटरीत जाऊन करावी.  मग कळेल कि देश म्हणजे काय. तुम्हाला काय, स्वातंत्र्य अगदी आयतं मिळालं म्हणून त्याची किंमत नाही, जरा झळ पोहोचू द्या मग कळेल.  तिकडे सीमेवर आपला जवान प्राणांची पर्वा न करता अहोरात्र झटतोय म्हणून आपल्याला शांत झोप येतेय त्यामुळे त्यांच्या सेवेची कदर नाही.  मग पाठवा ना घरातला प्रत्येक माणूस मिलिटरीत, जाऊ द्या सीमेवर, मग कळेल डाळआट्याचा भाव.  घरात बसून गप कुणीही मारतो हो. जरा बाहेर निघा, देशावर प्रेम करा, मग बघा देश कसा त्याची परतफेड करतोय ते.  प्रत्येक घरात सैनिक असल्यावर कुठला आतंकवादी आपल्याकडे नजर वर करून बघेल. 

मग करायची सुरुवात, फार काही नाही, फक्त मानसिकता बदला, प्रेम, माया, माणसांमाणसा वर देखील करा.  काय हरकत आहे, इतर धर्माचा, जातीचा, पंथाचा असला तर काय झालं आपल्याला फक्त माणसावर प्रेम करायचं आहे. वृत्ती बदला, सगळं काही बदलेल. 

घ्या मग माझ्यासोबत शपथ, आम्ही कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही, झोपलेल्या देशाभिमानाला, स्वाभिमानाला जागे करू, प्रत्येकावर प्रेम करू, भारतीयत्वाचा स्वीकार करू, एकदा का आपण प्रगतिपथावरून प्रगती साध्य केली कि निवांत होताना भरपूर वेळ मिळणार आहे भांडण्यासाठी, पण तत्पूर्वी एकदा प्रेम करून तर पाहू. देशाला एकदा फक्त एकदा घडवून तर पाहू.

बघा आज मनामनात द्वंद्व झाले नसते तर नैराश्याच्या गर्तेत अडकून पडलो असतो.  पण आज कळले कि मी कितीही हतबल झालो असलो तरी मला देखील विचार करता येतो.  काहीतरी चांगले करायची इच्छा व्यक्त करता येते त्याची अंमलबजावणी करायची प्रेरणा मिळते, असे द्वंद्व प्रत्येकात झाले पाहिजे,  मी तर माझा मार्ग निवडला आहे, सगळे उपाय करून झालेत आता अनुशासन आणि नियोजनाच्या माध्यमातून एकदा हे करून तर पाहू. 





Monday, December 13, 2010

थांबा, वाचा व लक्षात ठेवा

थांबा, वाचा व लक्षात ठेवा

भारतीय राज्यघटनेने २६ जानेवारी, १९५० रोजी, प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वाची पूर्णता करण्यासाठी खालीलप्रमाणे मूलभूत अधिकार वा हक्क दिलेले आहे.

१. कायद्यापुढे समानता

२. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई

३. सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी

४. अस्पृश्यता निर्मुलन

५. स्वातंत्र्याचा हक्क

अ) भाषण स्वातंत्र्य

आ) सभा स्वातंत्र्य

इ) संघटना स्वातंत्र्य

ई) संचार स्वातंत्र्य

उ) वास्तव्य स्वातंत्र्य

ऊ) व्यवसाय स्वातंत्र्य

ऋ) मालमत्ता हक्क

ऌ) मुद्रण स्वातंत्र्य

६. अपराधांबद्दलच्या दोषसिद्धी बाबत संरक्षण

७. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण

वरील सर्व मूलभूत अधिकार व हक्क यांची जाणीव नागरिकाला त्याच्या सोयीनुसार होत असते किंवा माहित असते, परंतु या सर्व हक्क व अधिकाराहून वेगळे काही अधिकार व हक्क नागरिकाला प्राप्त झालेले आहे ज्यांचे दैनंदिन जीवनात प्रामुख्याने वापर होत असतो परंतु माहितीअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ते सर्व अधिकार व हक्क सखोलपणे मांडले आहेत आणि ते सर्व नागरिकांच्या स्मरणात कायम राहावे यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत: व गरज पडल्यास इतरांना तशी जाणीव करून देणे गरजेचे आहे.

प्रत्येक नागरिक त्याच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करीत असतो, काही गोष्टी खपून जातात पण काही गोष्टी ह्या गुन्हा प्रकारात मोडू शकतात. कुणीही नेहमी जाणतेपणी गुन्हे करीत नाही तरीही तो ह्या सर्व प्रकारात भरडल्या जातो. त्यामुळे आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की गुन्हे नेमके कुठल्या प्रकारचे असतात.

गुन्ह्याचे प्रकार

फौजदारी प्रक्रिया संहीतेन्वाये गुन्हे जरी अनेक प्रकारचे अनेक कायद्याखाली येत असले तरी त्यांचे दोनच प्रकार असतात.

१) दखलपात्र

२) अदखलपात्र

दखलपात्र गुन्ह्याचे दोन प्रकार आहे

अ) जमानती गुन्हा

आ) गैरजमानती गुन्हा

जमानती गुन्हा : या मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ५० प्रमाणे संबंधित नागरिकाला किंवा इसमाला जमानतीवर मुक्त होण्याचा अधिकार आहे. जमानती गुन्ह्यात जामीन न देणे हे कायद्याच्या दृष्टीने गैर कृत्य आहे अशा गुन्ह्यामध्ये अटक केल्यास पोलीस अधिका-याने संबंधित नागरिकास सूचना द्यावी लागते व त्याला जमानतीवर मुक्त करू शकतो. या गुन्ह्यामध्ये पोलिसाने जामीन मागताच त्वरित जामीन दिला पाहिजे. पोलीस नागरिकाला न्यायालयापर्यंत अटक कारण आणण्याची गरज नाही.

गैरजमानती गुन्हा : गैर जमानती गुन्ह्यात संबंधित नागरिकाला किंवा व्यक्तीला अटक झाल्यास पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला जमानतीवर मुक्त करू शकत नाही परंतु गैरजमानती गुन्ह्यामध्ये न्यायालयासमोर जमानत मिळू शकते. गैरजमानती गुन्ह्यामध्ये अटक होण्याची शक्यता असेल तर सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांचेकडे अटक पूर्व जामिन मिळविता येतो.

अटक

आता आपण गुन्ह्याचे प्रकार पाहिले, म्हणजे पर्यायाने अटक बद्दल जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता सर्वप्रथम प्रथम वर्दी पोलीस स्टेशनला नोंदविणे गरजेचे आहे. त्याकरिता कुठलीही अनुचित घटना वा अपराध घडल्यास त्याची प्रथम वर्दी तात्काळ लेखी किंवा तोंडी स्वरुपात पोलीस अधिका-यास द्यावी. प्रथम वर्दी देण्यास विलंब झालं असल्यास विलंबाचे समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे. गुन्हा व अपराध याची प्रथम वर्दी फोनवरून देखील देता येते. प्रथम वर्दी देण्या-यास त्याची प्रत नि:शुल्क मागण्याचा अधिकार आहे. अधिका-याने तशी प्रत तात्काळ नि:शुल्क देणे अत्यावश्यक आहे तसे ते त्याचे कर्तव्य आहे.

नागरिकाला सर्वप्रथम अटकेची कारणे कळण्याचा अधिकार आहे. जर पोलिसांनी आपणास वारंटशिवाय अटक केली असेल तर पोलीस अधिका-याने आपणास आपल्या अटकेची कारणे सांगणे आवश्यक आहे. वारंटशिवाय अटक दखलपात्र गुन्ह्यात होऊ शकते. जर आपणास वारंटशिवाय अटक केली असेल तर गैर जमानतिय प्रकरण सोडून, आपण जमानतीवर मुक्त होऊ शकता, ह्याकरिता आपणास जमीनदार द्यावे लागतील. अदखलपात्र गुन्ह्यात वारंटशिवाय पोलीस अटक करू शकत नाही.

अटक केल्यानंतर, कुठलाही पोलीस अधिकारी आपल्याला न्यायालयाच्या विशेष आदेशाशिवाय २४ तासाच्यावर ताब्यात ठेवू शकत नाही. यात न्यायालयात नेण्याकरिता लागणारा वेळ धरण्यात येत नाही.

अटकेतील नागरिकाचे अधिकार

पोलिसांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य करावे. पोलिसांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही. तुमचे नांव, पत्ता, व्यवस्थित सांगावा. पोलीस तुम्हाला कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास भाग पाडू शकत नाही. ज्या उत्तरामुळे तुम्ही गुन्हेगार ठरू शकता अशी उत्तरे देऊ नये. लेखी उत्तरे दिल्यास हस्ताक्षर करण्याची गरज नाही आणि तशी मागणी कायदेशीररीत्या पोलीस करू शकत नाही. पोलीस चौकशीच्यावेळी कोणतेही निवेदन करण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाला वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे. पोलीस कार्यवाही सोबत फौजदारी प्रकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे. अटक झालेली व्यक्ती गरीब असेल तर संबंधित न्यायालयाकडून किंवा सरकारी खर्चाने वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे. अटक व्यक्ती इच्छा असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेऊ शकते.

कोणत्याही व्यक्तीला किंवा नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलविण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलीस अधिकारी, चौकशी सुरु असलेल्या प्रकरणातील तपशील व परिस्थितीची माहिती असलेल्या कुठल्याही व्यक्तीला लेखी सूचना देऊन पोलीस ठाण्यात बोलावू शकतो. पोलीस अधिका-याने स्त्रियांना व मुलांना पोलीस ठाण्यावर न बोलविता प्रकरणाची चौकशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कारणे क्रमप्राप्त आहे त्यासाठी पोलीस ठाण्यात चौकशीला बोलविण्याचा अधिकार पोलिसांना नाही.

स्त्री गुन्हेगार व अटक

स्त्रियांना अटक झाल्यास त्यांचेकारिता काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही स्त्रीला वारंटशिवाय अटक करता येते, परंतु अटक करावयाची असल्यास अटकेचे कारण पोलिसांनी सांगणे हे बंधनकारक आहे. स्त्री गुन्हेगारांना सर्वसामान्य पुरुष गुन्हेगारांसोबत न ठेवता वेगळ्या जागी ठेवणे बंधनकारक आहे. स्त्री गुन्हेगार असेल तर स्त्री पोलिसांचा पहारा ठेवणे हे कायद्याने बंधनकारक आहे. स्त्रीची वैद्यकीय तपासणी स्त्री डॉक्टरकडूनच केली गेली पाहिजे. स्त्रियांना चौकशीचे दरम्यान एकांतात विचारपूस करता येत नाही. त्याकरिता स्त्री पोलीस, स्त्री अधिकारी, स्त्री होमगार्ड यांच्या उपस्थितीतच विचारपूस कारणे कायद्याने बंधनकारक आहे. अटक झालेली स्त्री जर बाळंतीण असेल तर तिला व तिच्या तान्ह्या मुलाला न्यायालयासमोर नेण्याची घाई करता येत नाही अश्यावेळी तिची व तिच्या मुलाची वैद्यकीयदृष्ट्या काळजी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. स्त्री गुन्हेगारांना वा साक्षदाराला रात्री पोलीस ठाण्यात बोलविता येत नाही, हे काम फक्त दिवसाच करावे असे कायद्याने बंधनकारक आहे.

झडती व जप्ती

अटक झाल्यानंतर पोलीस अटक व्यक्तीची किंवा त्याच्या घराची झडती घेऊ शकतात व जवळील वस्तू जप्त करू शकतात. परंतु त्याची पोच देणे पोलिसांना बंधनकारक आहे. सक्षम न्यायालयाने वारंट काढल्यावर किंवा असे वारंट काढण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीत झडती घेतली जाते. झडती घेणारी व्यक्ती अधिकृत असल्याची खात्री नागरिक करून घेऊ शकतो.

साधारणपणे चौकशीच्या संदर्भात असं एखादा पुरावा हाती येण्याची शक्यता असल्यास झडती होऊ शकते, तसेच सर्व साधारण पद्धतीने झडतीच्या उद्देशात बाधा येणार असल्यास झडती घेता येते. आणि असे समजण्यास आधार असल्याची लेखी नोंद करण्यात आली असेल व संबंधित अधिका-यास तसे कळविण्यात आले असेल तर पोलीस अधिकारी वारंटशिवाय देखील एखाद्या जागेची झडती घेऊ शकतात. झडतीचे वारंट मागण्याचा अधिकार नागरिकाला आहे. ते वारंट योग्य अधिका-याने दिलेले आहे की नाही, त्यात दिलेला पत्ता बरोबर आहे की नाही, व झडतीच्या वारंटची जप्ती एखादी जागा किंवा वस्तू इतकीच मर्यादित आहे किंवा काय याबाबत तुम्ही खात्री करून घेऊ शकतात.

झडती घेतांना पोलीस अधिका-याची कर्तव्ये

अधिकृत झडती त्या भागातील किमान दोन सन्माननीय साक्षिदारासमक्ष घेण्यात यावी. अधिकृत झडतीचा उद्देश संबंधित व्यक्तीला स्पष्ट करावा. पोलीस अधिकारी व उपस्थित असलेल्या साक्षदाराने सर्वप्रथम आपली अंग झडती संबंधित नागरिकाला द्यावी. झडतीत जप्त केलेल्या वस्तूची सूची व त्या जेथे सापडल्या त्या जागांची यादी करून त्यावर साक्षदाराची सही घ्यायला हवी व तिची एक प्रत झडती घेतलेल्या जागेच्या रहिवाशांना द्यायला हवी. स्त्री गुन्हेगाराची झडती स्त्री पोलीस व स्त्री अधिका-यानेच घ्यावी. जेथे झडती घ्यावयाची आहे त्या जागेतील रहिवाशी व संबंधित व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा प्रतिनिधी झडतीच्या वेळी उपस्थित राहू शकतो. झडतीची पूर्ण कार्यवाही झाल्यावर घटनास्थळी घटना पंचनामा करून त्यावर पंचाची सही घ्यावी व पंचनामा वाचून दाखवावा. झडतीमध्ये मिळालेल्या वस्तूची यादी करून जप्ती पत्रक तयार करणे हे सुध्दा पोलीस अधिका-याचेच कर्तव्य आहे.

झडती घेतांना नागरिकांची कर्तव्ये.

पोलीस अधिका-याने आपल्या झडतीचा उद्देश प्रकट केल्यास किंवा झडती संबंधी समक्ष न्यायालयाद्वारे वारंट जप्ती असल्यास त्याची खात्री करून नागरिकाने आपली व आपल्या राहत्या जागेची झडती घेण्यास संमती द्यावी. झडतीचे वेळी कोणताही संशय निर्माण होईल अश्या हालचाली करू नये. झडती घेतांना पोलिसांच्या व पंचाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. झडतीच्या उद्देशाबद्दल सांगितल्याबरोबर प्रथम पोलीस अधिकारी व साक्षिदार यांची अंग झडती घ्यावी. झडतीच्या वेळी संबंधित नागरिकाला आपला प्रतिनिधी समक्ष ठेवण्याचा अधिकार आहे. झडतीत जप्त केलेल्या सर्व वस्तूंची यादी व त्यावर पंचाची सही असलेली एक प्रत संबंधित नागरिकाला द्यायला हवी.

वरील सर्व बाबी ह्या प्रत्यके नागरिकाच्या दैनंदिन आयुष्यात फार मोठे मोलाचे मार्गदर्शन ठरू शकतात.

जयंत अलोणी

अधिवक्ता, नागपूर

Friday, September 10, 2010

सांग ना का परत येऊ मी ?

तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, की तू आणि बाबांनी माझ्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या, मला उत्तमोत्तम शिक्षण दिलं, परदेशात शिकायला पाठवलं, माझ्या पायावर मला उभं केलं, पण आज तुमच्यामुळे जे मी शिकू शकलो त्याचा काहीतरी उपयोग भारतात होतो का, तूच सांग मला साधी नोकरी तरी मिळेल का? मग सांग ना का परत येऊ मी ?

आज तुझी सून मारिया जरी अमेरिकन असली तरी, तिने तू सांगितल्याप्रमाणे आपल्याकडील सर्व चालीरीती शिकून घेतल्या ना. तूच म्हणतेस की भारतातील मुलीने हे सर्व शिकण्यासाठी नाक मुरडलं असतं पण मारियाने अगदी आवडीने सर्व शिकून घेतलं नव्हे ती त्यात पारंगत झालीय. मग सांग ना का परत येऊ मी?

आज इथे बाबांच्या प्रकृतीची नीट काळजी घेण्यासाठी उत्तमोत्तम दवाखाने आहेत, निष्णात तज्ञ आहेत, त्यांचा दमा कुठल्याकुठे निघून गेला, तुझीपण तब्येत छान झालीय, आज मारियाचे बाळंतपण जवळ आल्यावर तू म्हणतेस की भारतात ये, इथे करू बाळंतपण, पण मी म्हणतोय की, बाळाचा जन्म इथे अमेरिकेत झाला तर आपल्या कुटुंबातील ते पाहिलं बाळ असेल की ज्याला अमेरिकेचे नागरिकत्वाचा अधिकार मिळेल, वर सर्व बाबींचा विचार करता, सांग ना का परत येऊ मी?

आई, आज तुमच्यामुळे जे यश मी अनुभवतो आहे, त्याचा उपभोग घेण्यासाठी तरी तुम्ही दोघेही इथे या? अगं तू म्हणतेस की इथे बाबांचं मन लागत नाही, तू म्हणतेस की इथे तुमच्या दोघांना इथे बोलायला कुणी नाही मग आम्ही दोघे नाही आहोत का? आणि आता आपल्याकडे एक बाळ येणार तरी कुणीच नाही, एकट एकट वाटतं असं कस म्हणतेस?

आई मला माहितीय की आपले सर्व नातेवाईक तिथे भारतात आहेत, पण तूच सांग कितीसे आपल्याकडे येतात आणि आपण तरी कुठेकुठे जातो, ते आहेत तिथे पण फक्त निमित्ताला, एरवी तुम्ही दोघेही तिथे एकटेच असताना, तुम्हाला तसं पाहून माझा जीव कासावीस होतो त्याचं काय, ते काही नाही मला तुमच्यासोबत राहायचंय, तुमची सेवा करायची आहे, इथल्या आणि तिथल्या गोष्टींमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. तुम्ही इथे आले की तुमच्या दोघांच्या तब्येती किती छान असतात, मला तुम्हा दोघांना अगदी सुखात पहायचंय, तुम्ही तिथे असला तर माझा जीव टांगणीवर असतो, सारखी हुरहूर लागून असते तरी तू सारखी मलाच समजाविण्याचा प्रयत्न करतेस, सांग ना तुम्ही दोघांनी माझ्यासोबत रहाव हि माझी इच्छा असताना सांग ना का परत येऊ मी?

बर आता तुला महत्वाचं सांगतोय, मागल्या वेळी मी जेव्हा भारतात आलो तेव्हा केवळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी दोन तीन जागी अर्ज करून पाहिला होता, पण उपयोग काय, मी जे इथे शिकलो त्या गोष्टीच मुळात भारतात माहिती नाही, तितकं तंत्रज्ञान तिथे विकसित झालं नाही, त्यावर मी स्वत:चा व्यवसाय करायचा म्हणून बँकेत कर्ज मागण्याकरिता गेलो तेव्हा मला २ लाख रुपयांची लाच मागण्यात आली, महामंडळात जागेसाठी अर्ज केला तिथे पण तेच उत्तर, तूच सांग, मी जे शिक्षण इथे घेतलं त्या शिक्षणाचा उपयोग तिथे करायचा म्हटलं तर तेथील लोकांना आणि पर्यायाने सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. जर माझ्या शिक्षणाचा इतकाच त्रास मला तिथे होतोय तर सांग ना का परत येऊ मी?

मी आणि मारिया तिथे बस्तान मांडण्याच्या दृष्टीने कितीतरी लोकांना, शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या पण जिथे तिथे भ्रष्ट लोकं बसली आहेत, नवीन काही सुरु करतो आणि रोजगाराची संधी उपलब्ध करतो म्हणतो तर तेथील अधिका-यांना तेच नेमकं नकोय, आता केवळ तुझ्या म्हणण्यानुसार तिथे येऊन राहायचे तर केवळ घरीच बसून राहावे लागेल, ते चालेल तुला? मग मला इतकं शिक्षण देऊन मोठ केलसं त्याचा काय उपयोग? तेव्हा तूच सांग ना का परत येऊ मी?

आज माझेजवळ सर्व सोयींयुक्त घर आहे, तुम्हाला नुसतं बसून रहायच आणि तुमची सेवा करू देण्याची संधी मला द्यायची आहे, ज्या परिस्थितीतून तुम्ही आलात त्या परिस्थितीवर मात करून मला यशस्वी केलं त्याची फळे चाखायला तरी तुम्ही माझ्यासोबत असावयास हवं. आज तुझ्या मुलाची अमेरिकेत स्वत:ची कंपनी आहे, विश्वाची सारी सुखं पायाशी लोळण घेत आहे, निदान तुझ्या मुलाचा उत्कर्ष तरी बघायला तुम्ही इथे या. तुझी सून तू सांगितल्याप्रमाणे सर्व सणवार करेल, आपलं घर आनंदाने भरून जाईल निदान या आनंदासाठी तरी तुम्ही दोघेही इथे या.

मी आज इथे ज्या पदावर आहे, ज्या उंचीवर आहे, त्याचा उपयोग तिथे भारतात नाही, माझ्या शिक्षणाचा तिथे कुणालाही फायदा नाही, किंवा तसा उपयोग करून घ्यावयाचा नाही, तशी संधी तिथे नाही, तिथे नियोजनच नाही, त्यामुळे अश्याठीकाणी येण्याचे कसे काय औचित्य असू शकते.

आणि या माझ्या कळकळीच्या विनंतीनंतरहि तुला असं वाटतंय की मी तिथे यावं तर निदान एक तरी चांगल कारण मला दे, मी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार आहे, पण जर या सर्व गोष्टी तिथे घडणारच नसतील तर तूच सांग ना, का परत येऊ मी?

संकल्प

हुंडा हा शब्द तुम्हा-आम्हाला काही नवीन नाही. आज मुलीच्या लग्नाचा खर्च व द्यावा लागणारा हुंडा यामुळे आपल्या देशात स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही सख्या आईवडिलांना व घरातील इतर मंडळींना मुलीचा जन्म नकोसा वाटतो. मुलगी जन्माला आली तर त्यांची तोंड मुरडतात. हि बला आपल्याच नशिबी कां यावी अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया असते. एकीकडे देवीची पूजा करायची, जगदंबा, एकविरा, अंबाबाई, तुळजाभवानी, जगन्माता अशी तिची स्तुती गायची आणि मुलीचा जन्म मात्र स्वागतार्ह मानायचा नाही असे हे दुभंगलेले दुहेरी समाजजीवन किती दिवस चालू द्यायचे ? परंतु दुर्दैवाने याबाबतीतही पुरुषांपेक्षा स्त्रियांचाच पुढाकार अधिक दिसून येतो.

मुलामुलींच्या लग्नात हुंडा देणे व घेणे हि वाईट प्रथा आजही सुरु आहे. आधीच्या काळी मुली अशिक्षित होत्या पण आज परिस्थिती बदललेली आहे. आजची तरुण पिढी शिक्षित आहे. आता तर खेड्यापाड्यात देखील मुली शिकल्या सावरल्या आहेत. त्यांना शिक्षण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आहे. पण तरी देखील हि प्रथा दिवसेंदिवस वाढतचं आहे. आजकाल खरे पाहिल्यास मुलींनाही आपल्या आईवडिलांनी लग्नात खूप खर्च करावं, लग्न थाटात करावे, हुंडा द्यावा असे वाटते. काय झाले खर्च केलं तर ? एकदाच तर करावं लागतो अशी त्यांची भूमिका असते. म्हणून हुंडा प्रथेच्या अनिर्बंध वाढीकरिता पुरुषाइतकीच स्त्री देखील तितकीच दोषी आहे. हुंड्याची रक्कम किती याकडे बघून जो मुलगा लग्नाला तयार होतं तो स्त्रीचा अपमानच करीत असतो. त्यामुळे कमाई करणारी स्त्री सुध्दा गुलामच राहते. कमाई करणे व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणे यात बरेच अंतर आहे. आजपर्यंत अडाणी व खालच्या वर्गातील स्त्रिया मोलमजुरी करून कमाई करतच होत्या. परंतु त्या कमाईवर त्यांचा हक्क नव्हता. आजही सुशिक्षित व नोकरी करण्या-या स्त्रियांचा सुध्दा त्यांच्या पगारावर अधिकार नाही. स्त्रियांना आज नागरिकत्वाचा हक्क मिळाला आहे. वडिलांच्या संपत्तीतहि वाटा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तरीसुद्धा तिचे भोग संपत नाही. हीच खरी वेदना आहे. आणि स्त्रियांचे भोग संपावेत असे स्त्रियांनाच वाटत नाही. हि या प्रश्नाची खरी शोकांतिका आहे.

हुंडा पद्धती हि समाजसंस्थेला लागलेली कीड आहे. यावर कायदेशीर उपाययोजना करून या दुष्ट पद्धतीला पायबंद घालण्याकरिता सन १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. कायद्यात अनेक तरतुदी दिल्या आहेत, परंतु प्रश्न मात्र मिटले नाही. लग्न झाल्यावर ती आपले घरी जाते, सुखी संसाराची अनेक स्वप्ने डोळ्यात घेवून जाते आणि ती स्वप्नं आसवांच्या रुपात बाहेर पडतात. इकडे नवरा आणि सासरची मंडळी ह्यांची पैशासाठी असलेली भूक मात्र शमता शमत नाही. मग सुरु होतो नववधूचा छळ. जा आपल्या वडिलाकडे आण ५०,०००/-, आण गाडी, अमक आण, ढमक आण, नाही आणलं तर घरात राहू देणार नाही, अशी टोमण्यांची स्पर्धा सुरु होते. त्यांच्या मागण्या वाढतंच जातात. मुलगी जाते आईवडिलांकडे, पण कित्येकवेळा आईवडिलांची परिस्थिती जेमतेम असते. मुलगी जन्माला आल्यापासून पै अन् पै जोडून रक्कम जमा करतात, तिच शिक्षण, लग्न करतात आणि आपली कर्तव्यपूर्ती करतात. पण मुलीचे भोग मात्र संपत नाही. जेव्हा ती रिकाम्या हातानी सासरी परत जाते तेव्हा तिचा शारिरीक, मानसिक छळ सुरु होतो. जीवघेण्या यातना सुरु होतात, तिला मारून टाकण्यात येते, जाळण्यात येते किंवा अनेकदा जीवघेण्या यातना सहन न झाल्याने व त्रास अनावर झाल्याने कित्येक स्त्रिया आत्महत्या करतात आणि आपले जीवन संपवितात. आपण हे सगळं रोज वर्तमानपत्रात वाचतो.

कायद्याने काहीही होत नाही, हुंडा प्रतिबंधक कायद्याने हुंडाबळी कमी झाले नाहीत. ज्यावेळेस कायदा आला त्याचवेळी त्याच्या पळवाटा पण आल्यात. त्यामुळे कायद्याने प्रश्न सुटत नसतो. कायदा वाट मोकळी करून देवून प्रश्न सोडविण्यास मदत करतो. परंतु आज कायदा पाळण्यापेक्षा कायदा मोडणां-यांचेच प्रमाण जास्त आहे. लोकांनी हे कायदे पाळावेत म्हणून लोकशिक्षणाची अत्यंत गरज आहे. अपराध्यांना पकडणे हि पोलिसांची जबाबदारी, त्यांना शिक्षा करणे हि न्यायालयाची जबाबदारी आणि आपण मात्र बेजबाबदार ? अशी भूमिका आता नागरिकांनी घेता कामा नये.

हुंड्याच्या अनिष्ठ प्रथेचा समूळ नाश करायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने मनोमन संकल्प केला पाहिजे. हुंडा मागणा-या मुलाशी मी लग्न करणार नाही असं संकल्प मुलींनी केलं पाहिजे. तसेच भगीनिमंडळाने आपले दिवाणखाने, लग्नमंडप, हुंड्याच्या लग्नाला दिले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. तसेच सुजाण व जागरूक नागरिकांनी असे गुन्हे घडले तर ते ताबडतोब संबंधित अधिकारी, पोलीस व सामाजिक संस्था ह्यांच्या नजरेस आणून द्यावेत. तसेच प्रत्येक युवकाने जर ठरविले की मी हुंडा घेणार नाही तर या प्रथेचा नयनाट होण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी आशा आहे. बघुया काय होतंय ते.

मानपान

मानपान हा शब्द मानापमान या शब्दाशी निगडीत आहे. मानपान म्हटलं की लगेच लग्न आठवतं. असं वाटतं की कुणाचं तरी लग्न सुरु आहे आणि नेमकी वरमाय कुठल्यातरी गोष्टीवरून अडून बसलीय. मग कारल्याचा वेल असो, वा चांदीची लवंग असो. पण खरचं मानपान म्हटलं की एवढचं आठवतं का, तर नाही, मानपान किंवा मानापमान म्हणजे अहंकाराची दुसरी बाजू.

आज कित्येक घरात या अहंकारावरून कितीतरी नाती भरकटली गेलीय, तुटली किंवा उध्वस्त झालीय. मग त्या नात्यात नवरा-बायको, मुलगी-आई-मुलगा, मुलगा-वडील-मुलगी, सासू-सून, सासरा-जावई, सासू-जावई, सासरा-सून, एवढेच नव्हे तर बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, दीर-भावजय, नणंद-भावजय, एकूण काय नातेवाईक-नातेवाईक. त्यात अजून भर पडते ती मित्र-मैत्रीण, मैत्रिणी-मैत्रिणी, मित्र-मित्र.

आपण म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली, खरंय ते, कुठल्या न कुठल्या कारणावरून वरील नात्यात सारखे वादविवाद, रुसवे-फुगवे, उणी-दुणी असतात. बरं त्यात काही नात्यात समझोता होतो आणि काही नाती विस्कटून जातात. पुष्कळदा इर्षा, घृणा, यात तिखटपणा आणतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात खरंच अहंकाराची गरज आहे का ? आधीच आपल्या आयुष्याची दोरी त्या बाप्पाच्या हातात असते आणि त्यात हे वाद, अहंकार, मानपान, मानापमान यामुळे आपण शारिरीक आणि मानसिक यातना स्वत:ला करून घेतो आणि त्या अलिखित मृत्यूच्या अजून समीप जातो. ह्यात गंमतीची बाब हि की हीच नाती आपण नीट पाळू शकत नाही आणि उगाच देशांत आणि जगात शांतता असावी अश्या बाता मारतो. आपणचं जर आपल्याच माणसात खुश नसू तर कुठल्या तोंडाने इतर लोकांसोबत खुशहाली आणि शांततेची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. कशी नांदेल जगात शांतता ?

त्यासाठी आज खरी गरज आहे, स्वत: मधील मी ला ओळखण्याची, आपण जर मनाने स्वच्छ राहिलो तर कुणाची बिशाद आहे आपल्यावर मानपानाची, अहंकाराची, मानापमानाची, इर्षेची, घृणेची सावली आणण्याची. परंतु मनुष्यप्राणी आणि त्याचा स्वभावच मुळी असा आहे ना, की जाणतेपणी व अजाणतेपणी या दोषांचा संसर्ग आपल्याला होतोच. जर हेच नेमकं टाळता आलं तर जग किती सुंदर असेल. त्यात प्रत्येक नातं अगदी घट्ट, प्रेमाने भारलेलं, हळुवार मनावर फुंकर घालणारं असेल.

रोज आपण निरनिराळी सुवासिक साबणं वापरतो, त्वचा अगदी घासूनपुसून लख्खं ठेवायचा प्रयत्न करतो पण मनाचं काय ? त्याला घासूनपुसून लख्खं ठेवण्यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणतात ना की, नाही निर्मळ मन काय करील साबण. पण आपण आपला हट्ट, अहं सोडत नाही, मग त्या नात्यात कितीही ताणतणाव आले तरी चालतील पण मी माझं मीपण सोडणार नाही. नका सोडू. राहा भांडत. अगदी नात्यातल्या प्रत्येकाशी भांडत राहा. त्यामुळे कुणाचा फायदा होतो? कुणाचाच नाही. उलट मनस्ताप, अवहेलना, अपमान, अपेक्षाभंग मात्र होतो. पण आपण हे सर्व अगदी आनंदाने उपभोगतो. मुळात आपल्याला नेमकं काय उपभोगायचं तेच मुळी कळत नाही. असल्या भांडणामुळे कुणीच कुणाचं राहत नाही शेवट अगदीच वाईट असतो किंबहुना तो सर्वांना माहित असतो तरी पण आपण वागू नये तसंच वागतो. जणू प्रेम, वात्सल्य, माया, ममता या शब्दांचा आपल्याला तिटकारा आहे.

केवळ एकच विचार आवश्यक आहे, वरील सर्व नात्यात जर प्रेमाची पेरणी केली, त्यावर वात्सल्याचा पाउस टाकला, आणि मायेने आणि ममतेने त्या पिकाचे संगोपन केले तर किती बहारदार वृक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जग किती सुंदर होईल. कितीतरी लोकांना त्याची मधाळ फळे चाखावयास मिळतील. आयुष्य सत्कारणी लागेल. नाहीतर जन्मलो कशासाठी, जगलो कसे आणि मेलो कशासाठी याचा कुठलाही अर्थ लागणार नाही. किती काळ जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्व आहे.

देवाने आयुष्य दिलंय आणि आयुष्याची सीमारेषा पण आखून दिलीय, मृत्यू नंतर आपले काय होते, कुठला जन्म आपण घेतो हे कोडे अजूनही उलगडले नाही. स्वर्ग आणि नरक कुणी पाहिलाय. त्यामुळे चित्रगुप्ताने प्रत्येक मनुष्याला त्याच्या मृत्यू नंतर पुढील जन्मात घालण्यापूर्वी त्या मनुष्याचा एक लेखाजोखा मांडला पाहिजे, मनुष्याने एकदा जरी मानपान, मानापमान, अहंकार, इर्षा, घृणा आदी गोष्टींचा वापर त्याच्या जीवनात केला असेल तरी त्याला परत मनुष्य जन्म देऊन जोपर्यंत तो प्रेम, वात्सल्य, माया, ममता, असल्या बाबीं त्याच्या जीवनात तो आचरणात आणित नाही तोपर्यत त्याच्या आत्म्याला मोक्ष देता येणार नाही असा नियमच केला पाहिजे.

मग कुठलीही सासू कारल्याच्या वेलीसाठी, चांदीच्या लवंगसाठी अडून बसणार नाही, आणि वर नमूद केलेल्या कुठल्याही नात्यात अहंकार, इर्षा, घृणा, राहणार नाही, मग आयुष्य सुंदर होण्यास कितीसा वेळ लागणार आहे. हे सर्व जेव्हा साध्य होईल त्याचवेळी सर्व जगात शांतता नांदेल आणि प्रत्येकाच्या जीवनाला त्याच्या जगण्याला अर्थ येईल आणि तिच त्याच्या जीवनाची आणि जगण्याची इतिकर्तव्यता असेल. काय पटतंय का ?

Friday, November 20, 2009

स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय ? हे सर्वात पहिले आपण जाणुन घेतले पाहीजे. स्त्री मुक्ती म्हणजे निव्वळ पुरुषांच्या विरोधात जाणे नव्हे तर `पुरुषप्रधान' संस्कृतीचा पगडा असलेल्या विशिष्ट पद्धतीचा विरोध करणारी चळवळ. पूर्वीची जाचक बंधने आज स्त्रियांवर नाहीत. पण याचा अर्थ स्त्री सर्वार्थाने मुक्त झाली असा होत नाही. स्त्री-मुक्ती चळवळी ठिकठिकाणी कार्यरत आहेत. हे विचार, ह्या चळवळी शहरापुरत्याच मर्यादित आहेत. दलित, आदिवासी, शोषित, पीडीत स्त्रियांना त्याही खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांना या चळवळीची सुतराम कल्पना नाही.

आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने शिरकाव केलेला आहे. पुरुषांनी स्त्रियांना मुक्त केले, मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिले. त्यातून त्यांची मानसिकता किमान बदलली आहे. स्त्रियांना मुक्ती हवी म्हणजे काय हवे? कोणापासून मुक्ती हवी? स्त्रियांच्या कार्यक्षेत्राबाबतचा अन्याय आता थोडा कमी झालेला दिसतो. आता असे कोणते क्षेत्र आहे की, तेथे महिला नाहीत? न्यायिक विभाग, महसूल खात्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पोलिस खात्यात सर्वोच्चपदी महिला आहेत. रिक्षाचालक, टॅक्‍सी ड्रायव्हर, रेल्वे इंजिन ड्रायव्हर, विमानचालक, बस कंडक्‍टर, तसेच विविध क्षेत्रांत अधिकारीपदी, सर्वोच्चपदी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात महिला अग्रेसर आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रपती, पंतप्रधान, या पदावर देखील महिला आरूढ झाल्या आहेत. एवढा पराक्रम त्या करू शकतात; मग त्या मुक्ती कोणापासून मागतात? तर या सर्व क्षेत्रात काम करत असताना त्या दुहेरी भूमिका निभावतात आणि अशा वेळी त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम रूढी, परंपरा करत असतात. महिलांना मुक्ती हवी ती बुरसटलेल्या रूढी परंपरांपासून वखवखलेल्या नजरांपासून, सासू, सून, नणंद, भावजया, त्यांच्या आया इत्यादी छळवादी महिलांकडून. स्त्री ही पुरुषाइतकीच स्वतंत्र आहे.

समजा कुटंबात एक मुलगा, एक मुलगी असेल तर आई मुलीला सांगते, बाई गं, तुझे हे काम आहे, आता हुंदडणे बंद कर. जरा स्वयंपाक -पाण्यात लक्ष घाल. घरकामाचं बघ. मुलाला मात्र यातील काहीच आई सांगत नाही तिचे बंधन फक्त मुलीला; मुलाला नाही. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती कोण चालवते ? मुलीला गौण आणि दुय्यम स्थान स्त्रीच बहाल करत असते. संस्कार करायचे, शिस्त लावायची तर मुलगा मुलगी दोघांनाही सारखीच लागली पाहिजे. कामाची वाटणी समान झाली पाहिजे. हे चक्र कुटुंबापासून पुढे जाईल.अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. म्हणजे कुटुंबापासून सुरुवात केल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक कुटुंब आहे. यातून कामाच्या समान वाटणीची समाजाला सवय लागेल. ती आपल्या प्रत्येक घरातून लागणार आहे. याचे आपण भान ठेवले पाहिजे. स्त्री-पुरुष आचार-विचार, संस्कारात समानता आणणारी स्त्रीमुक्ती हवी आहे...

स्त्रियांच्या मनावर, बुद्धीवर, रूढी परंपरेचे, पुरुषप्रधान संस्कृतीचे थरच्या थर साठलेले आहेत. ते अगोदर गळून पडायला हवे. स्त्री-मुक्ती चळवळींनी काही गोष्टींचा नको तेवढा विपर्यास केला, अतिरेक केला. उदा. कुंकू, बांगड्या, साड्या किंवा अन्य पारंपरिक वेशभूषा, केशभूषा झिडकारणे आणि शर्ट पँट घालून बॉयकट करून पुरुषी वागणे म्हणजे स्त्री-मुक्ती, अशी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला गेला. मुलगी म्हणून जन्माला येणं हे काही स्त्रिच्या हाती नाही. पण पुढे वंश चालू राहायचा तर मुलगी म्हणजे स्त्री हवीच. आईलाच आपल्या स्त्रीत्वाचा विसर पडावा अन्‌ पोटी मुलगी जन्माला येऊ नये याचा खटाटोप तिनं करावा, यापेक्षा स्त्रीजातीचा मोठा अपमान कोणता असेल? स्त्रीचा उभा जन्म अनेक बंधनात अडकलेला असतो. आता खरी गरज आहे, स्त्रियांनी आत्मपरीक्षण करण्याची, त्यांच्यात भरपुर ताकद आहे, ही पुरुषप्रधान संस्कृती संपविण्याची, पण त्याकरिता स्त्रियांनी आपली मानसिकता बदलायला हवी, आणि स्त्रि मुक्तिची चळवळ योग्य दिशेने न्यावयास हवी.

Sunday, November 8, 2009

हे जपण्याचा प्रयत्न करा

हे जपण्याचा प्रयत्न करा

आई आणि वडील रात्री खुप उशीरा कामावरून येतात. दोघेही थकलेले आणि त्रस्त झालेले असतात. त्यांचा ६ वर्षाचा मुलगा त्यांची वाट पहात दाराजवळ बसलेला असतो.

मुलगा :- आई बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू ?

वडील :- हो अगदी, निसं:कोचपणे.

मुलगा :- बाबा तुम्ही किती पैसे कमाविता ?

वडील :- हा काय प्रश्न आहे?

मुलगा :- आई तु किती पैसे कमाविते?

आई वडील :- अरे पण तुला काय करायचंय त्याचं ?

मुलगा :- मला फ़क्त जाणुन घ्यायचंय. कि तुम्ही दोघे एका तासाला किती पैसे कमाविता? आई (चिडुन) :- १०० रुपये

मुलगा :- आणि बाबा तुम्ही ?

वडील (रागावुन) :- २०० रुपये.

मुलगा थोडावेळ विचार करून : बाबा मला तुम्ही १०० रुपये द्याल?

वडील (चिडुन) :- तुला जर कुठलेही फ़ालतु खेळणे विकत घ्यायचे असेल तर गप्प बस. आणि मुकाट्याने आपल्या खोलीत जाऊन अभ्यास कर नाहीतर झोपायला जा. माझं डोक उठवू नकोस.

मुलगा :- आई तु तरी मला १०० रुपये देशील ?

आई :- आता बर्‍याबोलाने खोलीत जातो कि एक फ़टका पाहिजे. मुलगा शांतपणे आपल्या खोलीत निघुन जातो. आईवडील जेवायला बसतात आणि एकमेकांना मुलाच्या वागण्यावरून नाही नाही ते बोलतात. थोड्यावेळाने दोघेही शांत होतात आणि विचार करतात कि त्यांचा मुलगा काही कारण असल्याशिवाय असे पैसे मागणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असेल. असे म्हणुन त्याच्या खोलीकडे जातात.

वडील :- का रे झोपलास का ?

मुलगा :- नाही बाबा जागाच आहे. का?

आई :- काही नाही रे आम्ही मघाशी तुझ्यावर विनाकारण चिडलो.

वडील :- आम्ही आमच्या ऑफ़िसचा राग तुझ्यावर काढला.

मुलगा :- जाऊ द्या ना बाबा.

वडील :- नाही ते काही नाही, हे घे तुला १०० रुपये पाहीजे होते ना.

(असे म्हणुन मुलाला १०० रुपये देतो) मुलगा आनंदाने त्याच्या पुस्तकामध्ये ठेवलेले पैसे काढतो. ते बघुन आईवडीलांचा राग अनावर होतो. तो लहान मुलगा त्याचे जवळचे पैसे मोजतो आणि छानंसं हसतो. ते पाहुन वडील अजुनच चिडतात.

वडील :- जर तुझ्याजवळ एवढे पैसे होते तर आम्हाला मागायची काय गरज होती?

मुलगा :- कारण माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते.

आई :- पण एवढ्या पैश्यांचं तु काय करणार आहे. काही नाही तुला आता फ़टकावलाच पाहीजे.

मुलगा :- थांब आई मला मारू नकोस. आई हे घे १०० रूपये आणि बाबा हे घ्या २०० रूपये. आता मी तुमचा एक तास विकत घेऊ शकतो का? प्लीज उद्या तुम्ही दोघे ही लवकर घरी या. मला घरी एकटं राहून कंटाळा आलाय, मला तुमच्यासोबत खेळायचंय आणि जेवायला जायचंय.

आईवडील त्या मुलाला बिलगुन ढसाढसा रडायला लागले.

या कथेतुन बोध :

ज्याच्यांवर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासोबत चांगला वेळ तुम्ही घालवत चला. जे आईवडील त्यांच्या जीवनात कष्टाने काम करीत आहे. त्यांच्यासाठी ही एक प्रांजळ सूचना. आपल्या हातातुन अशी वेळ सुटु देऊ नका. तुमच्या जीवनात ज्यांचे मोलाचे स्थान आहे त्यांच्या सोबत ती वेळ तुम्ही सत्कारणी लावा. जर उद्या आपला मॄत्यु झाला तर ज्या ऑफ़ीससाठी आपण अहोरात्र काम करतो त्या ऑफ़ीसला तुमच्या जागी दुसरा व्यक्ती काही दिवसात मिळेल. पण आपली जी जिवाभावाची लोकं आहेत त्यांच्या जीवनात आपल्या जाण्याने होणारी उणीव कधीच भरून निघणार नाही. विचार करा. कुणालाही गॄहीत धरू नका. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना तुमच्या जवळ धरून चला. कारण एकेदिवशी तुम्ही उठाल आणि तुम्हाला जाणवेल की काही दगडं शोधण्याच्या ध्यासात तुम्ही हातातील हिरे गमावुन बसला आहात.